सिंहगड, वारजे कोथरूडमध्ये रिमझिम सरी, उकाड्याने हैराण पुणेकरांना अखेर दिलासा! विश्रांतवाडीतही पावसाची हजेरी

0

अखेर रविवारी सायंकाळी गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानंतर शहरात पावसाने हजेरी लावली.. सिंहगड रोड आणि वारजे माळवाडी कोथरूडमध्ये रिमझिम सरींनी सुरुवात झाली असून तर घोरपडी आणि विश्रांतवाडी परिसरातही हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. याशिवाय सहकारनगर, मंडई, कोंढवा, हडपसर, कात्रज तसेच बाणेर-बालेवाडी परिसरातही पावसाच्या सरी बरसल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील दोन ते तीन दिवस पुणे आणि परिसरात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे कमाल तापमानात आणखी घट होऊन पुणेकरांना उकाड्यापासून आणखी दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

अधिक वाचा  पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी कशी होते? प्रथम पसंतीत विजय झाला नाही तर पर्याय काय? सविस्तर वाचा

पुण्यासह परिसरात मागील आठवडाभरापासून कमाल तापमान ३७ ते ४० अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले होते. दमट हवामान आणि उन्हाच्या तीव्र झळांमुळे दिवसभर घराबाहेर पडणेही अनेकांसाठी त्रासदायक ठरत होते. अचानक आलेल्या पावसामुळे काही ठिकाणी वाहनचालकांची धावपळ उडाल्याचं बघायला मिळालं आहे. रविवारी मात्र वातावरणात अचानक बदल झाला. आज विविध भागांत पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.