पुणे विषारी दारू दुर्घटनेनंतर दारू माफियांविरोधात राज्यव्यापी ‘स्ट्राईक’ आठ दिवसांत ३,३१२ गुन्हे; २,७५७ अटक, ७४ हजार लिटर गावठी दारू जप्त

0

पुण्यातील विषारी दारू प्रकरणात निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू माफियांविरोधात राज्यभर धडक मोहीम हाती घेतली आहे. २८ मे ते ४ जून या अवघ्या आठ दिवसांच्या कालावधीत ३ हजार ३१२ गुन्हे दाखल करण्यात आले असून २ हजार ७५७ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ९ कोटी ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ७४ हजार लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे.

पुण्यातील दुर्घटनेनंतर अवैध दारू व्यवसायाचे राज्यभर पसरलेले जाळे पुन्हा एकदा उघड झाले आहे. उत्पादन शुल्क विभागाने राज्यभर एकाच वेळी छापेमारी मोहीम राबवत अवैध दारू निर्मिती केंद्रे, साठेबाजी, वाहतूक आणि विक्री साखळीवर घाव घातला. या मोहिमेत १०७ वाहने जप्त करण्यात आली. तसेच अवैध दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे तब्बल १२ लाख २५ हजार लिटर रसायन नष्ट करण्यात आले.

अधिक वाचा  राज्यात ‘अर्णब’ चक्रीवादळामुळं पाच दिवस पाऊस कोसळणार, या जिल्ह्यांना अलर्ट; गडचिरोली मुसळधारेचा इशारा

जप्तीचे धक्कादायक चित्र

गावठी दारू जप्तीमध्ये पुणे विभाग राज्यात अव्वल ठरला. पुणे विभागातून १८ हजार लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. कोकण विभागातून १७ हजार लिटर, तर नागपूर विभागातून ६ हजार लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. पुणे दुर्घटनेनंतरही एवढ्या मोठ्या प्रमाणात गावठी दारू सापडणे, हे राज्यातील अवैध दारू व्यवसायाचे भीषण वास्तव अधोरेखित करणारे आहे.

कोकण विभाग आघाडीवर

दाखल गुन्ह्यांच्या संख्येत कोकण विभाग आघाडीवर राहिला असून तेथे ५८७ गुन्ह्यांची नोंद झाली. नागपूर विभागात ४८८, तर पुणे विभागात ४३७ गुन्हे दाखल करण्यात आले. या तीन विभागांतच दीड हजारांहून अधिक गुन्हे उघडकीस आल्याने राज्यातील अवैध दारू माफियांचे जाळे किती व्यापक आहे, याचा अंदाज येतो.

अधिक वाचा  भाजपाचे पदवीधर, शिक्षक मतदार संघासाठी पुण्यावर विशेष लक्ष; कारवाईच्या भीतीने नगरसेवकांचा मतदारांशी संपर्क?

धडक कारवाईचा परिणाम

पुणे दुर्घटनेनंतर उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे या आकडेवारीतून दिसून येते. अल्प कालावधीत हजारो गुन्ह्यांवर कारवाई करून मोठ्या प्रमाणात गावठी दारू, रसायने आणि वाहने जप्त करण्यात आल्याने अवैध दारू व्यवसायाविरोधातील मोहिमेला वेग आला आहे.

कालावधी : २८ मे ते ४ जून

  • दाखल गुन्हे : ३,३१२
  • अटक : २,७५७
  • जप्त वाहने : १०७
  • जप्त मुद्देमाल : ₹९.११ कोटी
  • जप्त गावठी दारू : ७४ हजार लिटर
  • नष्ट केलेले रसायन : १२.२५ लाख लिटर

गावठी दारू जप्ती

पुणे : १८ हजार लिटर

कोकण : १७ हजार लिटर

अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक : हर्षदा देशमुखांनी पाहिल्या फेरीतच विजय आणला दृष्टीक्षेपात; कोटापूर्तीस अवघ्या ७३६ मतांची गरज! लादलेल्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचा स्पष्ट संदेश?

नागपूर : ६ हजार लिटर

सर्वाधिक गुन्हे

कोकण : ५८७

नागपूर : ४८८

पुणे : ४३७

“पुण्यातील दुर्घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यभर व्यापक मोहीम हाती घेतली असून प्रत्येक जिल्ह्यात कठोर कारवाई सुरू आहे. अवैध दारूची निर्मिती, वाहतूक, साठवणूक किंवा विक्री करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई केली जात आहे. अवैध दारूविरोधातील ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून दोषींना शोधून त्यांच्यावर निर्णायक कारवाई केली जाईल. नागरिकांनीही अवैध दारूविषयी कोणतीही माहिती आढळल्यास ती तातडीने उत्पादन शुल्क विभागाला कळवावी. जनसहभाग आणि सतर्कतेच्या बळावरच अवैध दारूच्या या साखळीवर प्रभावीपणे आळा घालता येईल.”

– प्रसाद सुर्वे, सहआयुक्त (अमलबजावणी व दक्षता), राज्य उत्पादन शुल्क विभाग