‘मला बीडचा बारामती करायचाय’, सरपंच खून प्रकरण गाजत असताना पंकजा मुंडेंचं मोठं विधान

0

मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीडमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. खून, गोळीबार, खंडणी अशा विविध गुन्हेगारी घटना समोर येत असल्याने बीडची तुलना बिहारशी केली जात आहे.कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील विविध आरोप होत आहे. एकीकडे बीडमध्ये सरपंच खून प्रकरण गाजत असताना आता भाजपच्या आमदार आणि कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठं विधान केलं आहे.

मला बीडचा बारामती करायचा आहे, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी बारामतीत झालेल्या विकासकामांचं तोंडभरून कौतुक केलं. बारामती मतदारसंघातील प्रत्येक कामांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष असते, असाच विकास मला बीडमध्ये करायचा आहे, अशा आशयाचं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्यांनी नुकतंच बारामतीचा दौरा केला. बारामतीतील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार उपस्थित होत्या.

अधिक वाचा  शिक्षक मतदारसंघातील मतदानादरम्यान उमेदवार ढसाढसा रडला, सर्व व्यवस्थेवरचा विश्वास उडालाय, मी इस्लाम स्वीकारणार

दरम्यान, पंकजा मुंडे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आणि बारामतीतील विकासकामांचं कौतुक केलं आहे. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, बारामती मतदारसंघातील प्रत्येक कामावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारीक लक्ष असतं. त्यांचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो. प्रत्येक काम नियोजनबद्ध पद्धतीने करण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळेच त्याचे प्रतिबिंब बारामतीतील प्रत्येक विकासकामांमध्ये दिसत आहे. काटेकोरपणा, वक्तशीरपणा यांसह उपमुख्यमंत्री अजित दादांच्या अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.”

“बारामतीच्या विकासाशी अजितदादांचे वेगळे नाते निर्माण झाले आहे, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवासह अनेक वर्षे सत्तेत असल्याचा फायदा बारामतीच्या विकासात निश्चित झालेला आहे. बारामतीत झालेल्या विकासकामांच्या धर्तीवरच माझ्या मतदारसंघासह मराठवाड्याचा विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन,” असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

अधिक वाचा  गोकुळचा पराभव जिव्हारी? महायुतीने पुन्हा एकदा दंड थोपटले? अध्यक्षपद रणनीती विधान परिषद निकालानंतरच ठरणार