आमदार रत्नाकर गुट्टेंचा नातू 1 जानेवारीपासून बेपत्ता, पुणे पोलिसांत तक्रार दाखल

0

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघाचे रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता झाला असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवड पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या भाचीचा मुलगा सुमित भागवत गुट्टे (वय 24)हा 1 जानेवारीपासून बेपत्ता झाला आहे. त्यामुळे गुट्टे कुटुंबात एकच खळबळ उडाली आहे. सुमित हा बुधवारी सकाळी 9 वाजता ज्यूपिटर हॉस्पिटल येथे मुलाखतीसाठी जात असल्याचं सांगत घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो आजपर्यंत घरी परतलेला नाही.

दोन तासांमध्ये घरी परत येतो असं म्हणून सुमित गुट्टेनं सांगितल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे. त्याच्याशी घरच्यांचं फोनवर शेवटचं संभाषण हे 1 जानेवारीला दुपारी तीन वाजता झालं होतं. त्यानंतर त्याचा फोन बंद आहे,अशी माहिती आमदार रत्नाकर गुट्टे यांनी दिली असून याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांकडे तक्रार दिल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

अधिक वाचा  दुसरी पसंती ठरवणार पुण्याचा शिक्षक आमदार, नेमकं गणित काय? निकालाआधीच सोप्या शब्दात समजून घ्या

गुट्टे म्हणाले, सध्या मी एका वेगळ्याच दु:खात असून माझा नातू मिसिंग आहे. माझा नातू मिसिंग असल्यामुळे मला शनिवारी(ता.4)परभणीमध्ये झालेल्या सर्वपक्षीय आक्रोश मोर्चातही सहभागी होता आले नाही. माझा नातू एक जानेवारीपासून मिसिंग आहे. माझ्या भाचीनं त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला,मात्र त्याचा फोन बंद असल्याचंही ते म्हणाले.

त्याचवेळी त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याची माहितीही दिली आहे.एक जानेवारीला त्याच्याशी दुपारी तीन वाजून तीन मिनिटांनी अखेरचं बोलणं झालं होतं. मात्र,तेव्हापासून तो बेपत्ता असून या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे असंही आमदार गुट्टे यांनी यावेळी म्हटलं आहे.

अधिक वाचा  २-२-१ वारं फिरलं..! शिक्षक-पदवीधर निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांना ‘कही खुशी कभी गम’चा धक्का; धक्कादायक अंदाज

भाजप आमदार सुरेश धसांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा म्हणून परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आलेल्या मोर्चात आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या अनुपस्थितीवर भाष्य केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना नातू बेपत्ता असल्यामुळे आपण मोर्चात सहभागी झालो नव्हता असा खुलासा केला.