पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे

0

गेल्या दोन दिवसांपासून पुण्याजवळील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू असतानाच हवामान विभागाने (IMD) आता पुणे जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. पुढील दोन ते चार दिवस पुणे शहर आणि जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली असून, प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

घाटांत ढगफुटीसदृश पावसाची शक्यता; धरणांतून विसर्ग सुरू

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे व नाशिक जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर पुढील ४८ तासांत अतिमुसळधार (ढगफुटीसदृश) पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून ५,७०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा वाढता जोर पाहता नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरात गुरुवारी काहीशी विश्रांती घेतल्यानंतर शुक्रवारी सकाळपासूनच पुन्हा रिपरिप सुरू झाली असून, पुढील दोन दिवस शहरातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक : हर्षदा देशमुखांनी पाहिल्या फेरीतच विजय आणला दृष्टीक्षेपात; कोटापूर्तीस अवघ्या ७३६ मतांची गरज! लादलेल्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचा स्पष्ट संदेश?

पावसाचा जोर वाढण्याचे कारण काय?

हवामान तज्ज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र छत्तीसगडवरून पुढे सरकत असून, ते गुजरात आणि मध्य प्रदेशच्या दिशेने प्रवास करत आहे. या हवामान प्रणालीमुळे पुढील तीन ते चार दिवस केवळ पुणेच नव्हे, तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडणार आहे.

राज्यातील पावसाची स्थिती आणि इशारे:

रेड अलर्ट: पुणे घाट परिसर आणि नाशिक घाट परिसर.

ऑरेंज अलर्ट: पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि जळगाव.

इतर जिल्हे: जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यांना गेल्या २४ तासांत अतिवृष्टीने झोडपले आहे. तसेच कोल्हापूर, सिंधुदुर्ग, मुंबई, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

अधिक वाचा  चंद्रकांतदादांच्या रणनीतीमुळे पुणे ‘शिक्षक’ची अशक्य जागा विजयी; पण सर्वत्र धुमधडाका करूनही ‘पदवी’मात्र मिळाली नाही

ऑगस्टमध्ये पावसाची ओढ राहण्याची शक्यता

आयएमडीने ३१ जुलै ते २७ ऑगस्ट या कालावधीचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. चालू हंगामात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत सुमारे १५% कमी पाऊस नोंदवला गेला आहे. सध्याच्या या स्पेलनंतर ऑगस्ट महिन्यात पावसात काहीशी घट (ओढ) होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, पुढील पावसाचे भवितव्य अल निनोच्या (El Niño) स्थितीवर अवलंबून असेल. घाटमाथ्यावर आणि पर्यटन स्थळांच्या परिसरात जाणाऱ्या नागरिकांनी तसेच प्रवाशांनी विशेष खबरदारी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.