मिळकतकर विभागाचे उच्चस्तरीय स्वतंत्र विशेष लेखापरीक्षण करण्याची पतित पावन संघटनेची मागणी

0

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या मिळकतकर विभागातील हार्ड डिस्क चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मिळकतकर विभागाचे उच्चस्तरीय, स्वतंत्र व निष्पक्ष विशेष लेखापरीक्षण तातडीने करण्यात यावे, अशी मागणी पतितपावन संघटनेने पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

संघटनेने स्पष्ट केले आहे की, या निवेदनाचा उद्देश कोणत्याही अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार किंवा इतर कोणत्याही व्यक्तीवर आरोप करणे नसून, नागरिकांचा महानगरपालिकेवरील विश्वास कायम राहावा, वस्तुस्थिती स्पष्ट व्हावी आणि प्रशासनातील पारदर्शकता व उत्तरदायित्व अधिक बळकट व्हावे हा आहे.
निवेदनात मिळकतकर विभागाचे विशेष लेखापरीक्षण पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत लेखापरीक्षण विभाग, शासनमान्य स्वतंत्र लेखापरीक्षण संस्था तसेच सनदी लेखापाल किंवा वित्तीय तज्ज्ञ यांच्या संयुक्त सहभागातून करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अधिक वाचा  पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

या विशेष लेखापरीक्षणामध्ये मागील पाच वर्षांतील मालमत्ता कर निर्धारण प्रक्रिया, कर कपात, करसवलत व करमाफीची प्रकरणे, मालमत्तेच्या वर्गीकरणातील बदल, महसुलावर परिणाम करणारे निर्णय, नियमबाह्य मंजुरी, मोठ्या प्रमाणावरील करदुरुस्त्या, अंतर्गत नियंत्रण व्यवस्था, महसुलाचे संभाव्य नुकसान तसेच आवश्यक असल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी किंवा बाह्य कंत्राटदार यांच्या भूमिकेची निष्पक्ष पडताळणी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

पतित पावन संघटनेने हे विशेष लेखापरीक्षण चार आठवड्यांच्या आत पूर्ण करून त्याचा अहवाल सार्वजनिक करण्याचीही मागणी केली आहे. यामुळे प्रशासनातील पारदर्शकता वाढून नागरिकांचा महानगरपालिकेवरील विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.

अधिक वाचा  पुणे पदवीधरमध्ये सोलापूर, शिक्षकमध्ये सातारा आघाडीवर शिक्षक मतदारसंघ ८५.८७ तर पदवीधर ६२.७८ टक्के मतदान

मिळकतकर विभाग हा पुणे महानगरपालिकेच्या महसुलाचा प्रमुख स्रोत असल्याने या विभागाच्या कामकाजाबाबत कोणताही संभ्रम राहू नये आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने करण्यात याव्यात, अशी अपेक्षाही पतित पावन संघटनेने व्यक्त केली आहे. यावेळी प्रांतसह संघटक रवींद्र भांडवलकर, सुनील मराठे, जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे, शहर पालक गिरीश काकडे संघटक संतोष गुरु, शिवराज निवदेकर, वेदांत अंधेकर उपस्थित होते.